कोकण कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु..

0
20250603_111441

कोकण कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु..

रत्नागिरी, दि. ३ जून-

कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या प्रमाणावर बदल दिसत आहॆ. कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करु. जेणेकरुन कोकण पहायला परदेशी पर्यटक येतील. कोकणची सरसता आणि समृद्धता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ही कोकणाने जन्माला घातली आहे. आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलेले आहे. माझ्या ३० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत माझे काम जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम हे पत्रकारांनी केले आहे. हे माझ्या अपरोक्ष पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहेत. त्यामुळे मला पत्रकारांबद्दल आत्मियता आहे.

कोकणचा विकास संपूर्ण महाराष्ट्राने पहावा, त्याची प्रसिध्दी करावी. या माध्यमातून परदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी यावे, यासाठी अशी कार्यशाळा राज्यभरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री डाॕ सामंत यांनी सांगितले.

सामंत पुढे म्हणाले, समाज माध्यमांमूळे मोठमोठया घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते. हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगलं काम करुन घेण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते. कोकणातील पत्रकारितेमध्ये वेगळी क्षमता आहे. कोकणातील पत्रकारांना बाळशस्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांचा वारसा आहे. हिंदी पत्रकारितेचे जनक बाबूराव पराडकर हे देखील कोकणातलेच. मी स्वत:ला सुदैवी मानतो कारण माझा जन्म या भूमीत झाला आहे आणि मी सध्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पत्रकारितेचे जन्मस्थान असलेले कोकण आम्ही कसे विकसीत केले, कसे जपून ठेवले आहे, हे महाराष्ट्रातील सर्व पत्रकरांनी पहावे यासाठी पुढील कार्यशाळा ही संपूर्ण राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार काम करतात. अशा पत्रकारांच्या मागे राज्यकर्त्यांचा राजाश्रय शंभर टक्के उभा करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज ज्या प्रमाणे ही कार्यशाळा घेतली आहे. त्याप्रमाणे पत्रकारांसाठी आवश्यक सेवा सुविधांची निर्मिती करण्यात येईल महाराष्ट्रात पत्रकारांचा फक्त सन्मान नाही, तर पत्रकारांसाठी आवश्यक सेवा-सुविधांची निर्मितीही केली जाते. हे चित्र देशात निर्माण झाले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डाॕ सामंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *