पहिल्याच पावसात मुंबई तुंबली…
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली…
मुंबई, दि. २७ मे २५ ;
मुंबईसह राज्यात दाखल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईची वाट लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली ती वाढतच गेली. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. मान्सूनने 55 वर्षाचा विक्रम मोडला असून मुंबई जलमय झाली.

मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागात पाणी साचले, किंग्ज सर्कल, वडाळा, सायन, हिंदमाता आणि माटुंगा परिसरात रस्त्यावर पाणी साचले. आठवड्याच्या पहिला दिवस सोमवारी सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना लोकलच्या विलंबाचा मोठा त्रास सहन करावा लागला. आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले, मुंबईतील भुयारी मेट्रो-3 ही नुकतीच सुरु झाली असून पहिल्याच पावसात या भुयारी मेट्रोला मोठा फटका बसला आहे. रस्ते, रेल्वे ट्रॅक, भुयारी मेट्रो मार्ग, कोस्टल रोड वर पाणी साचून व्यवस्था कोलमडली तर काही रुग्णालयांमध्येही पाणी शिरले.
मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला. ठाणे ते सीएसएमटी कडे जाणारी जलद लोकल ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भायखळा ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्ये रेल्वेने काही लोकल स्थगित केल्या व त्याच लोकल परत पाठवल्या.मुंबईत मान्सूनचे आगमान ११ जूनच्या आसपास होत असते पण यावर्षी मात्र १६ दिवस आधीच पावसाने हजेरी लावून सर्वांची तारांबळ उडवली. पहिल्याच पावसात मुंबई महानगर पालिकेच्या यंत्रणेची पोलखोल झाली.
