परिवहन विभागातील जागांचा PPP तत्वावर विकास..

0
IMG-20250522-WA0052

परिवहन विभागातील जागांचा PPP तत्वावर विकास..

मुंबई, दि. २३ मे २५ :-

परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा अनाधिकृत रित्या बळकावण्यात आल्या आहेत. १५ ठिकाणी परिवहन कार्यालय भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

सरनाईक पुढे म्हणाले की, मोटार परिवहन विभागाकडील सर्व ४३ जागांची माहिती अद्यावत करून या जागांची सद्य स्थिती, जागेचा ७/१२, ८- अ यासह अन्य अनुषंगिक कागदपत्रे तयार करून याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयास सादर कारवी. जिथे अतिक्रमण झाले आहे, त्या ठिकाणी ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत.

मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील ७ एकर जमीन, वडाळा, जुहू व अंधेरी येथील जमीनी अनाधिकृत रित्या अतिक्रमण करून झोपडपट्टी धारकांनी गिळंकृत केल्या आहेत. याकडे गेले कित्येक वर्षांमध्ये परिवहन विभागाचे लक्ष गेले नाही हे दुर्दैवी आहे. यापुढे अशाप्रकारे जमिनी हडप केला जाऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने कुंपण घालून घ्यावे व लवकरात लवकर सदर जमिनी विकास करण्याचा आराखडा तयार करावा असे निर्देश या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

भविष्यात महसूल वाढीसाठी या जागांचा पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यामध्ये पुढील ५० वर्षाचा विचार करून परिवहन विभागासाठी आवश्यक असलेली कार्यालये, टेस्टिंग ट्रॅक व इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात..या अनुषंगाने मंत्री सरनाईक यांनी परिवहन आयुक्त कार्यालयात मोटार परिवहन विभागाच्या विविध जागांच्या सद्य स्थितीचा आढावा घेतला. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सह सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *