भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर…!
भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर…!
नवी दिल्ली, दि. १४ मे २५
ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या लष्कराची ताकद जगाला समजली. भारतीय ड्रोन आणि मिसाईलच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराला झोपही लागणार नाही. यापुढे जर भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर सर्वनाश करू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअर बेसला भेट देऊन ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगाने भारतीय वायूदलाची ताकद पाहिली आहे. आमच्या सैन्यात शत्रूच्या अणुबॉम्बची ताकद काढून घेण्याची धमक आहे. यापुढे ज्यावेळी भारतीय पराक्रमाची चर्चा होईल त्यावेळी लष्कराच्या कामगिरीची नोंद घेतली जाईल. भारतीय लष्करामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले. प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या कार्याला सलाम करत आहे. ऑपरेशन सिंदूर हे काही सामान्य सैन्य अभियान नव्हते. ते भारताचे नीती, आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. एस-400 ने आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमला अभूतपूर्व बळ दिले आहे. एक मजबूत सुरक्षा कवच ही भारताची ओळख बनली आहे. पाकिस्तानने अनेक प्रयत्न करूनही कुठेही काहीही नुकसान झाले नाही.
भारतावर जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार त्याला प्रत्युत्तर देऊ. भारत कोणताही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या सरकारला दहशतवादाच्या सूत्रधारांपासून वेगळे मानले जाणार नाही.अधर्माचा नाश, धर्माच्या स्थापनेसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. जेव्हा आपल्या मुली, बहिणींचे कुंकू पुसले तेव्हा अतिरेक्यांचा फणा त्यांच्या घरात घुसून ठेचला, दहशतवाद्यांचे पंख छाटले, दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. भारताकडे डोळे वटारुन बघाल तर खात्माच होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
