images (34)

दहावीचा निकाल ९४.१० टक्के :

मुंबई दि. १३ मे २५ ;

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार ०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.१४ इतकी असून मुलांची टक्केवारी ९२.३१ इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे. नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील ८,८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९२.२७ अशी उल्लेखनीय आहे.

दहावीच्या एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर २३ हजार ४८९ शाळांपैकी ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.८२ टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात ९४.८१, छत्रपती संभाजीनगर विभागात ९२.८२, मुंबई विभागात ९५.८४, कोल्हापूर विभागात ९६.८७, अमरावती विभागात ९२.९५, नाशिक विभागात ९३.०४ आणि लातूर विभागात ९२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *