…ही मोहीम गावागावात पोहचवा!
मुंबई, दि. 26 सप्टेंबर:
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मराठवाड्यातील ८ जिल्हे तसेच नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यां सोबत संवाद साधून कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोनावर मात करण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम प्रभावीपणे राबवावी.
या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. ही मोहिम आरोग्याची चळवळ झाली पाहिजे. आपले कुटुंब, गाव, शहर, जिल्हा व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल असा विश्वास आहे,यात आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण घेणार आहोत. हातपाय धुणे, स्वच्छतेची काळजी घेणे अशा सूचना ग्रामीण भाग व तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे.
लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेच अर्थचक्र बिघडले आहे.त्यामुळे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीनवशैलीतील बदल स्विकारावे लागतील. स्वतःची काळजी घेऊन कामांसाठी बाहेर पडावे लागेल, असे ही ठाकरे म्हणाले.
