‘ऑपरेशन सिंदूर’ फक्त ट्रेलर..
‘ऑपरेशन सिंदूर’ फक्त ट्रेलर..
मुंबई, दि. ८ मे २०२५:
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र ऑपरेशन सिंदूर हा ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच म्हटले होते. आजचा एअर स्ट्राईक हा ट्रेलर असून खरा पिक्चर अजून बाकी आहे. पूर्वी आपल्या जवानांचा शिरच्छेद करुन पाकिस्तानात घेऊन जाण्याचे पाप दहशतवाद्यांनी केले होते. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी पाकड्यांना प्रत्युत्तर दिले नव्हते. दहशतवादी हल्ल्यानंतर ते मूग गिळून बसले होते, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातला हा नवा भारत आहे. घरात घुसून मारु अशा प्रकारची प्रतिक्रिया देणारा हा भारत आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप नागरिकांची हत्या केली, तर आज एअर स्ट्राईक करताना आपल्या सैन्याने पाकिस्तानातील निरपराध नागरिकांची काळजी घेतली. यापुढे देखील पाकड्यांना असेच चोख उत्तर मिळेल, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण सर्व देशवासीय मोदींच्या पाठिशी उभे आहेत असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
