images (30)

हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ.

मुंबई, दि. १८ एप्रिल;
प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे. उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? मग हिंदीची जबरदस्ती इथेच का ? असा प्रश्न विचारून सरकारने हा मुद्दा ताणू नये आणि आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

हिंदी भाषेच्या सक्तीवर कडाडून हल्ला चढवत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सरकार सध्या सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका.

या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत?भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही,  महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठेतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठेतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारं पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *