डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान RSS व भाजपानेच केला.

0
IMG-20250414-WA0119

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान RSS व भाजपानेच केला.

मुंबई, दि. १४ एप्रिल:

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आल्यापासूनच देशात सामाजिक तणाव वाढला आहे. जात आणि धर्माच्या आधारावर भाजप राजकारण करत असून मूलभूत प्रश्नांपासून ते सतत पळ काढत आहेत.मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाले, हाथरस, उन्नावच्या घटना घडल्या पण मोदी बोलले नाहीत. महामहिम राष्ट्रपतींना नवीन संसद भवन व राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण न देऊन अपमान केला. मागील 11 वर्षात अल्पसंख्याक व दलित समाजावर अत्याचार वाढले आहेत. वक्फ बोर्ड नवीन कायदा मुस्लिम समाजाच्या हितासाठी नाही तर लाडक्या मित्रांना वक्फची जमीन देण्यासासाठी आणला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा दलित व अल्पसंख्याक समाजाबद्दलचा कळवळा हे केवळ ‘पुतणा मावशीचे प्रेम’, आहे असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

 

 

भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त खासदार वर्षा गायकवाड यांनी चैत्यभूमी येथे जाऊन त्यांच्या स्मृतींस कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, देशात वाढत चाललेली बेरोजगारी, महागाई आणि महिलांवरील अत्याचार यावर मोदींनी बोलायला हवे पण ते जनतेच्या प्रश्नावर बोलत नाहीत. मोदींना व भाजपाला महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कळलेले नाहीत, संविधान समजले नाही व भारत देशही समजला नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, समाज कारण व राजकारण यांचे अतूट नातं आहे आणि धर्मकारणाला राजकारणात स्थान नसावं. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत म्हणजे एकतेचा, अखंडतेचा आणि न्यायाचा भारत आहे. मात्र नरेंद्र मोदींचे सरकार केवळ फूट पाडणारे आणि द्वेष पसरवणारे राजकारण करत आहे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

खा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, मागील 11 वर्षात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबावर नेहमी अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली आहे. काँग्रेस वा गांधी कुटुंबाला शिव्या देऊन, त्यांची बदनामी करून नरेंद्र मोदी व भाजपा सरकार आपले अपयश लपवत आहे पण त्यांच्या अपप्रचाराने देशाचा खरा इतिहास बदलणार नाही. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून स्वातंत्र्यानंतरही मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत भाजपाची मातृसंस्था आरएसएस चे काडीचेही योगदान नाही. बाबासाहेबांचा अपमान तर आरएसएस व भाजपानेच केला आहे. काँग्रेसने सर्व जाती धर्माला सोबत घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने देश चालवला आहे, असेही खासदार गायकवाड म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *