वक्फच्या जमिनींवर तिरक्या नजरेने बघू नये.
वक्फच्या जमिनींवर तिरक्या नजरेने बघू नये.
मुंबई दि. ३ एप्रिल ;
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात लोकांच्या धार्मिक मालमत्तेमध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज काय? वक्फ म्हणजेच दान धर्मातून आलेल्या जमिनीवर कोणाचाही अधिकार नाही. सरकारने वक्फच्या जमिनींवर तिरक्या नजरेने बघू नये. कायदे असे करावेत की, वक्फच्या जमीनी सामाजिक कार्यासाठी वापरता येईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, मुंबईतील अंबानी यांचे घर कोणत्या जमिनीवर आहे? दुर्दैवाने मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी वक्फचा दुरुपयोग केला. लोकांच्या धार्मिक विषयात जायची काय गरज आहे. संविधानाचं उल्लंघन करण्याच काम सुरू आहे. आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे. मग आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? एकदा जमीन वक्फ करण्यात आली, म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली. परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही. आता कायदा करायचा असेल तर असा करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. त्यांच्या वाड-वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला. आता दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील जमिनी देखील मोकळ्या बाजारात येणार आहे. संसद वक्फच्या जागेवर आहे. वक्फ संसदेवर पण दावा करेल. राईट टू रिलीजन आपण मानणार नाही का? संसद ही ब्रिटिशकालीन वास्तू आहे. संसद बांधताना ते कुठे होते? त्यांचा जन्म देखील झाला नव्हता. किरण रिजीजू आम्ही काय वेडे आहोत का? सरकारचा एक जबाबदार मंत्री सभागृहात ऑन रेकॉर्ड चुकीची वक्तव्य करतो आणि हे वक्तव्य जगभर जात आहे. आता यावर काय बोलायचं? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,जनता आणि पोलीस यांच्यात सुसंवाद असायला हवा. यासाठी महाराष्ट्रामधील पोलीस स्थानकांमध्ये दरवर्षी ‘इफ्तार पार्टी’ व्हायची! यंदाच्या वर्षी त्याच्या निमंत्रण पत्रिका छापून झाल्यानंतर वरून आदेश आला की, ते करू नका. नेमकं सरकारला करायचंय काय ? असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की,आता माझा सरकारला सवाल आहे की हिंदू मंदिरात असलेले अब्जो रुपयांचे सोने आहे. आता हे सोनं तुम्ही ताब्यात घेणार का? मला सरकारने उत्तर द्यावं. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विचारांनी आणि कामांनी वेगळे आहेत. आमचे आदर्श शरद पवार व आमचे विचार गांधी व नेहरू यांचे आहेत. त्यामुळे जातीयवादी शक्तींबरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याबाबतीत संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. असे जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले.
