काळ्या कायद्याविरोधात राज्यभरात आंदोलन!
काळ्या कायद्याविरोधात राज्यभरात आंदोलन!
केंद्र सरकारने शेतकरी आणि कामागारांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केलेः
मुंबई, दि. २५ सप्टेंबर:
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी असून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधयके संसदेत मंजूर करुन घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
काँग्रेस भाजपा सरकार विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहेच त्याबरोबर online campaign सुद्धा चालवणार आहे.
काँग्रेसचे आंदोलन असेल असेल….
२६ सप्टेंबर रोजी #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम राबवण्यात येणार असून काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ही शेतकरीविरोधी विधेयके मागे घ्यावीत अशी मागणी करणारे व्हीडीओ, फोटो, संदेश सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम, यू ट्यूबवर पोस्ट करणार आहेत.
२८ सप्टेंबर रोजी राज्यातील काँग्रेसचे नेते, मंत्री, आमदार काळे कायदे मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन राज्यपालांना देणार आहेत.
२ ऑक्टोबर २०२०. किसान मजदूर बचाव दिवस-
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला ‘किसान-मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार आहे. राज्यभरात सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन तसेच मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे.
ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात राज्यस्तरीय व्हर्चुअल किसान मेळावा आयोजित केला जाणार आहे.
२ ते ३१ ऑक्टोबर – सह्यांची मोहीम.
शेतकरी, शेतमजूर, बाजार समितीतील दुकानदार, बाजार समिती मधील कामगार, कष्टकरी यांच्या सह्यांची मोहिम राबवून १ कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केलेः अशोक चव्हाण
केंद्रातील भाजप सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. सत्तेत आल्यापासून या सरकारने सातत्याने शेतक-यांची फसवणूकच केली असून तीन कृषी विधेयकांच्या माध्यमातून या सरकारने शेतक-यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कामगार कायद्यातील नव्या बदलांमुळे कामगारही देशोधडीला लागणार आहेत. मोदी सरकार या विधेयकाच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करू पाहात आहे. या विधेयकांचे फायदे जनतेला सांगण्यासाठी सरकारने दलेर मेहंदी आणि कंगणा रानावत या कलाकारांची निवड केली आहे, यासाठी त्यांना एकही शेती तज्ञ मिळाला नाही, असा टोला अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारला लावला. काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत असून या कायद्याविरोधात लढाई लढेल असे चव्हाण म्हणाले.
