‘औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला’ अशी पाटी लावा!
‘औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला’ अशी पाटी लावा!
मुंबई, दि. १ एप्रिल २०२५
राज्यात सुरु असलेल्या औरंगजेबाची कबर या मुद्द्यावर मनसे अधक्ष ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात भाष्य केले. औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला आहे असे राज ठाकरे म्हणाले.
आपल्या भाषणात राज ठाकरे पुढे म्हणाले की, औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत आपण अडकलो आहोत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं?औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊसाहेब, हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजीराजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगी शिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर औरंजेबाच्या एका मुलाला छत्रपती संभाजी महाराजांनी आसरा दिला. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले असेही राज ठाकरे म्हणाले.
