मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते!
मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते!
मुंबई, दि. १ एप्रिल २५;
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ७५ वर्षे वयानंतर नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांच्या विधानावर एक्सवर प्रतिक्रीया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 79 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते तर मोरारजी देसाई 83 वर्षे आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या 81 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही. भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही.२०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल असेही बावनकुळे महणाले.
