भरमसाठ बिल घेणा-या हाॅस्पिटल्सवर कारवाई!
पुणे, दि. २५ सप्टेंबर :
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच औषधांचा काळाबाजार करणा-यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोरोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहित अत्यंत प्रभावीपणे राबवा असे निर्देशही अजित पवार यांनी दिले. विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा असे निर्देशही अजित पवार यांनी दिले.
कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत उपचारासाठीच्या सुविधाही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
