Ads

--

कुणाल कामराला धमकी देणा-यांवर कडक कारवाई करा.

By Xtralarge News

March 24, 2025 6:20 pm

Ads

कुणाल कामराला धमकी देणा-यांवर कडक कारवाई करा.

मुंबई, दि. २४ मार्च;

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या गुंडांनी केलेली तोडफोड चिंताजनक व कायद्याच्या राज्यात शोभणारी नाही. कुणाल कामाला सत्ताधारी थेट धमक्या देत असताना भाजपा युती सरकार झोपले आहे का ? सत्ताधा-यांना गुंडगिरी करण्याची मोकळीक दिली आहे का? असा संतप्त सवाल करत सत्ताधारी पक्षाच्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी मांडलेला उच्छाद निंदनीय असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न पडला आहे. लोकशाहीत टीका स्विकारायला शिकले पाहिजे असे पंतप्रधान मोदी दोनच दिवसापूर्वी म्हणाले आहेत. तुम्हाला टीका सहन झाली नाही तर लोकशाही मार्गाने त्यावर कारवाई करावी पण ठोकशाही कशासाठी. भाजपा व त्यांचे मित्र पक्ष विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांची बदनामी करतात तेव्हा चालते का? शिंदे सेनेचे नेते कुणाल कामराला थेट धमक्या देत आहेत आणि त्याच्यावर हल्ला करण्याचं आवाहन करत आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.

तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. कार्यक्रमस्थळी आणि कलाकाराला सुरक्षेची हमी द्यावी. शांततेत आंदोलन करण्याचा हक्क सगळ्यांना आहे, पण हिंसा आणि धमक्यांचा हक्क कोणालाच नाही. कायदा हा सर्वोच्च स्थानी राहिलाच पाहिजे, असे खासदार गायकवाड म्हणाल्या.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांसारख्या अक्कलशून्य लोकांनी अपमान तेव्हा या सरकारकडून कोणताही संताप व्यक्त करण्यात आला नाही. पण एका विनोदी कार्यक्रमावरून मात्र हे सरकार हादरलं आहे. ज्या ठिकाणी स्टँडअप कॉमिक कुणाल कामरा यांनी परफॉर्मन्स केला, त्या हॅबिटॅट या ठिकाणावर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तोडफोड केली.

जेव्हा सत्ताधारीच कायद्याचा आदर करत नाहीत, तेव्हा सामान्य माणसानं कायद्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? या हल्ल्यानंतर हॅबिटॅटनं भीतीच्या वातावरणामुळे तात्पुरतं आपलं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही केवळ एक सांस्कृतिक जागा नव्हे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि आज तेच भयाच्या छायेखाली आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

No comments to show.

Leave a Comment