नागपूरची हिंसक घटना हे सरकारचे अपयश.
नागपूरची हिंसक घटना हे सरकारचे अपयश.
नवी दिल्ली, दि. १८ मार्च २५ ;
सामाजिक सौहार्द जपणाऱ्या नागपूर शहरात हिंसक घटना घडावी हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे प्रतिनिधी आहेत पण शांतताप्रिय शहरात दंगल भडकली जाते व त्याची कल्पना सरकारला नाही हे आश्चर्याचे आहे. गृहविभाग व राज्य सरकारचे हे अपयश आहे. सत्ताधारी पक्षाने राजकीय स्वार्थासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवले आहे. नागपूरमधील हिंसक घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नागपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. नागपूर नेहमीच शांतता आणि सामाजिक ऐक्यासाठी ओळखले जाते, देशभरात दंगली होत असतानादेखील, नागपूरने कधीही अशा प्रकारच्या हिंसाचाराला थारा दिला नव्हता पण दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून फडणवीस सरकारमधील काही मंत्री जाणीवपूर्वक भडकाऊ वक्तव्ये करत आहेत, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आज त्याचे परिणाम नागपूरच्या रस्त्यांवर दिसत आहेत. या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, गृहमंत्री म्हणून ते आपली जबाबदारी चोख पार पाडू शकले नाहीत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून तात्काळ हटवावे.
महाराष्ट्राला थोर साधू संत, महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारचा हिंसाचार व्हावा ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धर्म आपल्या जागेवर व राजकारण आपल्या जागी आहे परंतु काही लोक धर्माच्या आधारावर राजकारण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे. नागपूरच्या नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, कोणत्याही षडयंत्राला बळी पडू नये, असे आवाहनही खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
