‘तुमचे’ पाप धुण्यासाठी महाकुंभमध्ये गेलो!
‘तुमचे’ पाप धुण्यासाठी महाकुंभमध्ये गेलो!
नारायणगाव, दि. १ मार्च २५ ;
अडीच वर्षांपूर्वी शिवसेना गहाण टाकण्याचे पाप केले, बाळासाहेबांचे विचार सोडण्याचे पाप केले ते पाप धुवण्यासाठी मी प्रयागराजला गेलो होतो, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
जुन्नरमधील नारायणगाव सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अडीच वर्ष माझ्यावर टीका केली अजूनही टीकाच करत आहेत. मी मात्र त्यांच्या टीकेला कामातून उत्तर देतो. गुवाहाटीला गेलेल्या महिला आमदारांवरही त्यांनी खालच्या शब्दात टीका केली. महाकुंभात ६५ कोटी लोकांनी स्नान केले. आपणही गेलो मात्र त्यावरही त्यांनी टीका केली. तुम्ही शिवसेना गहाण टाकण्याचे पाप केले ते धुवण्यासाठी प्रयागराजला गेलो होतो, असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून राज्यभरातून चांगले कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मात्र तुमच्याकडून का जात आहेत त्याचा विचार करा, असे ते म्हणाले. त्यांची अवस्था निरोप्रमाणे झाली आहे. जेव्हा रोम जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता, तशाच प्रकारे दुसऱ्याचे जळताना आपलंही जळतय पण याचं भान नसल्याने तुम्हाला आनंद होतोय, अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली.
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींची महालाट आली. मात्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरीत शरद सोनावणे या अपक्ष आमदारांने भगवा डौलाने फडकवला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कधीही जाती धर्माचा विचार केला नाही. जो आला त्याचे काम केले. अडीच वर्षापूर्वी रिक्षाने मर्सिडिजला मागे टाकले. जेव्हा शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले. शिवसेना, धनुष्यबाण संकटात आली तेव्हा आम्ही उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यामुळे लाडकी बहिण सारखी योजना राबवता आली. लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खरी शिवसेना कोणाची, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण हे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालांतून जनतेने दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. महायुतीचे सरकार आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर एकवर आणले. कॉमन मॅनला सुपर मॅन करायचे आहेत. अडीच वर्षात शेतकऱ्यांना ४५००० कोटींची मदत केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ४६० कोटींची मदत केली आणि हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. जुन्नरमध्ये एमआयडीसीचा विचार करुन असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले खुर्ची शोधणारा नाही तर माणसे शोधणारा आणि माणसांचे दुख: शोधणारा आहे. जिथे जातो तिथे लोकांचे भरभरुन प्रेम मिळते. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सर्वात मोठं पद आहे. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे पक्ष वाढवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करा, असे ते म्हणाले.
