दोषी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तत्काळ राजीनामा घ्या.
दोषी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तत्काळ राजीनामा घ्या.
मुंबई, दि. २० फेब्रुवारी;
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावलेला मंत्री सरकारमध्ये कसा काय राहू शकतो, असा प्रश्न विचारून माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
भ्रष्ट भाजपा युती सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, दररोज एका मंत्र्यांचे भ्रष्ट कारनामे बाहेर येत आहेत तरीही सरकारला जनाची आणि मनाचीही लाज वाटत नाही. आता तर कृषी मंत्र्यालाच फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे, असे असताना त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काही अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त मोठ्या घोषणा करत असतात पण त्यांच्या मंत्रिमंडळात किती सहकारी भ्रष्टाचारी आहेत ते त्यांना दिसत नाही का, भ्रष्ट व कोर्टाने दोषी ठरवलेल्या मंत्र्यांना पाठीशी घालू नका. असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केवळ आरोप झाले तरी भाजपा सरकार युद्ध पातळीवर काम करून त्यांच्यावर कारवाई करते. पण आपल्याच मंत्रीमंडळात भ्रष्ट लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत दाखवू शकत नाहीत. भ्रष्ट मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची नाच्चकी होत आहे. आता कसलेही कारण न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
