मोदी सरकारने बजेटमधून कोणाला काय दिले ?
मोदी सरकारने बजेटमधून कोणाला काय दिले ?
दिल्ली, दि. १ फेब्रुवारी ;
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात आयकरात किती सवलत मिळाली हा एक महत्वाचा मुद्दा असतो. यावेळी १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नोकरदार व मध्यमवर्गीय करदात्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत ५० हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली आहे. ३६ जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत, वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे स्वस्त होतील.
शेतकऱ्यांना ५ लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्जाची तरतूद केली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना १०० जिल्ह्यात राबवणार. दुग्धव्यवसाय आणि मत्स्य पालनासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद केली आहे. डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. कापसाच्या उत्पादनासाठी 5 वर्षांचे मिशन निश्चित केले आहे, यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार आहे.
विमा क्षेत्रासाठी परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. IIT च्या ६,५०० व मेडीकलच्या ७५,००० जागा वाढवल्या जाणार आहेत. लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना सुरु केली असून पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी बजेटमध्ये एक रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहन पूर्वीपेक्षा स्वस्त होतील. बॅटरी आणि इतर सुट्टे पार्ट स्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे.
बिहारमध्ये माखाना बोर्डाची स्थापना तसेच बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, पाटणा आयआयटीमध्ये अन्न प्रक्रिया सुविधा, वसतिगृहे आणि इतर सुविधा वाढवणे, पाटणा विमानतळाचा विस्तार, मिथिलांचलसाठी पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाचा लाभ आणि इतर अनेक घोषणा देखील बिहारसाठी करण्यात आल्या आहेत.
