स्वतः घरात बसू पण दुसऱ्याला म्हणतात रुसू बाई रुसू !
स्वतः घरात बसू पण दुसऱ्याला म्हणतात रुसू बाई रुसू !
जालना, दि २५ जानेवारी :-
माझ्यातला कार्यकर्ता खुर्ची शोधत नाही काम शोधतो, सतत कार्यरत राहणे हेच माझे ध्येय असून रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. जालना येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या विराट आशा आभार सभेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरून मतदान केल्याबद्दल त्यांनी जनतेचे जाहीर आभार मानले.
यावेळी बोलताना, निवडणुकीच्या आधी प्रचारासाठी इथे आलो असता महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले होते त्यानुसार या भागातील महायुतीचे पाचही उमेदवार निवडून आले. त्यावेळी मी शब्द दिला होता की जिंकलो तर विजयाचा गुलाल खेळण्यासाठी पुन्हा इथे येईन त्यानुसार आज इथे तुम्हाला धन्यवाद द्यायला आणि तुमचे आभार मानायला इथे आलो असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला विजय आज आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडक्या तरुणांचे आणि जालना शहरातील लाडक्या मतदारांचे आभार मानले.
मुंबई आणि ठाण्यानंतर या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी भरभरून प्रेम केलं, आणि इथल्या जनतेनेही बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केले. मराठवाडा हा शिवसेनेचा अभेद्य गड आहे, आणि यापुढेही कायम राहणार आहे. या जालन्यातून शिवसेनेच्या दोन तर महायुतीच्या पाचही जागा निवडून आल्या यालाच ‘जालन्याचा जलवा’ म्हणतात असे कौतुक त्यांनी केले.
जालन्यातील जनतेने भरभरून प्रेम केल्याने हा अर्जुन चक्रव्ह्यूह भेदण्यात यशस्वी ठरला आहे. तर हिकमत उढाण यांची उडान कुणी रोखू शकले नाही.हे दोघे शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत. हिकमत आणि अर्जुन ही करण-अर्जुना सारखी जोडी आहे. ही जोडी जालन्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली.
शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने आपल्याला दिले, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खटला चालला, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेऊन आपल्याला न्याय दिला. अखेर जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची भाषा केली. मात्र जनतेने आपला कौल आम्हाला देऊन त्यांचा उरलासुरला नक्षा बदलवून टाकल, 97 जागा लढवून तुम्हाला अवघ्या 20 जागा मिळाल्या तर 80 जागा लढवून शिवसेनेला 60 जागांवर विजय मिळाला.
लोकसभा निवडणुकीत उबाठा गटापेक्षा 2 लाख मते आपल्याला जास्त मिळाली, तर विधानसभेत तब्बल 15 लाख मते जास्त मिळाली त्यामुळे खरी शिवसेना कुणाची..? बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे असे निक्षून सांगितले. या पक्षात आज कुणी मालक आणि नोकर नाही, आपण सर्वजण कार्यकर्ते म्हणून काम करतो आहे. इथे राजाचा मुलगा राजा नाही होणार तोच राजा बनणार जो काम करणार असे सांगितले.
या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं यश हे बाळासाहेबांच्या विचारांचे महायुतीच्या एकजुटीचे, महायुतीच्या ताकतीचे आहे. अडीच वर्षे पायाला भिंगरी लावून काम केलं. लोकांचे प्रश्न सोडवले, हे श्रेय लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी आणि सर्व कार्यकर्त्यांचे आहे असे सांगितले. 2019 साली संधी आली तेव्हा तत्कालीन नेतृत्वाने लगेच संधी साधून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, मात्र आपण ते विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उठाव केला. विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आपण स्वतः अमित शाह याना फोन करून हवं त्याला नेतृत्व म्हणून निवडायला सांगितले असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही पदाची लालसा ठेवुन काम करणारा हा एकनाथ शिंदे नाही तर लोकांसाठी काम करणारा एकनाथ शिंदे असल्याचे मत व्यक्त केले.
काही जण पराभूत होऊनही सुधरत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह माझ्यावर टीका करतात. स्वतःला अमित शाह यांच्या नखाचीही सर नसूनही वाघनखे काढण्याची भाषा करतात. परवा माझ्यावर रुसू बाई रुसू म्हणत टीका केली म्हणजे स्वतः घरात बसू पण दुसऱ्याला म्हणतात रुसू बाई रुसू असे म्हणत या टीकेचा त्यांनी समाचार घेतला.
