नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग.
मुंबई, दि. २९ डिसेंबर ;
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहिली व्यावसायिक विमान उड्डाण मान्यता चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. इंडिगो A-320 या पहिल्या व्यावसायिक विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग झाले. यावेळी यशस्वी चाचणीबद्दल विमानाला वॉटर कॅननची सलामीही देण्यात आली.
महिना भरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 या विमानांचे येथे लँडींग झाले होते. या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात आले आहे. नवी मुंबई विमानतळ मार्च 2025 रोजी सुरू होणार असल्याचे समजते.
हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे देशातील सर्वात मोठे दुसरे विमानतळ आहे. जवळपास 5,945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आले आहेत. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात.
“महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद क्षण असून विकास आणि कनेक्टिव्हिटिला चालना देणाऱ्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे”, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
