CM धुळ फेकणे बंद करा, सुर्यवंशींच्या खुन्यांना कठोर शिक्षा करा.

0
IMG-20241223-WA0079

CM धुळ फेकणे बंद करा, सुर्यवंशींच्या खुन्यांना कठोर शिक्षा करा.

मुंबई, दि. २४ डिसेंबर ;

परभणीतील घटनेनंतर भाजपा युती सरकारचे मंत्री सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतात त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यात राजकारण दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली ते राजकारण नव्हते का? असा प्रश्न विचारून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुर्यवंशींच्या कुटुंबाची भेट घेतली तर ती राजकीय भेट व जातीजातीत द्वेष पसरवण्यासाठी कशी होते? मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा दुटप्पीपणा आहे, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या परभणी भेटीवर केलेल्या टीकेचा समाचार घेत खासदार वर्षा खासदार पुढे म्हणाल्या की, भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सुर्यवंशींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे दुर्लक्ष केले. सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झालेला आहे, त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या अशा पोस्टमार्टेम अहवालात म्हटले आहे. सोमनाथला कोणताही आजार नव्हता असे सूर्यवंशी कुटुंबाचे म्हणणे आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सोमनाथला श्वसनाचा आजार होता अशी खोटी माहिती देऊन राजकीय पळवाट काढली आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या गुन्हेगारांवर अद्याप कारवाई केली नाही, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

एका पीडित कुटुंबाला आधार देणे ही माणुसकी आहे. दलित, बहुजनांच्या न्यायासाठी राहुल गांधी नेहमीच उभे राहिले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल पण भाजपा युती सरकार खोटे बोलून एका आईच्या दुःखात अधिक भर घालत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणे आणि मूळ विषयापासून भरकटवणे बंद करा असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *