महान दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन..
महान दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन….
मुंबई, दि. २३ डिसेंबर :-
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आजारणामुळे निधन झाले. नुकताच त्यांनी 90 वा वाढदिवस साजरा केला होता. श्याम बेनेगल यांनी 1974 मध्ये ‘अंकुर’ चित्रपटापासून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं, ‘निशांत’, ‘भूमिका’, ‘मंथन’, ‘जुबैदा’, ‘सरदारी बेगम’ अशा अजरामर चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.
श्याम बेनेगल यांना पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. त्यांना 2018 सालचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.
“आपल्या प्रतिभाशाली दिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटक्षेत्रातील दीपस्तंभ हरपला आहे. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनानं बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा प्रयोगशील चित्रपट दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. सामाजिक भान राखून त्या धाटणीचे सर्वस्पर्शी चित्रपट बनवण्यात बेनेगल यांचा हातखंडा होता. भारतीय चित्रपटविश्वाला समृद्धता, नवी उंची प्राप्त करून देण्यात बेनेगल यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचं निधन ही भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी आहे. मी श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बेनेगल कुटुंबियांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
