पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा!
पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा!
मुंबई, दि. ११ डिसेंबर;
भाजपकडून मिशन लोटस राबवलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मोठा दावा केला आहे. स्वत:चं राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी निवडणूक लढवतो तो मतदारसंघाचा विकास आणि आपले राजकीय भविष्य काय राहील अशी विवंचना असेल तर यासाठी महाविकास आघाडीचे किंवा शरद पवार यांच्या गटाचे खासदार, आमदार अशी भूमिका घेऊ शकतात, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना आ. दरेकर यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांचा रोज सकाळी उठल्यावर आरोप करणे हा एकमेव कार्यक्रम असतो. त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. येणाऱ्या दोन दिवसांत सर्व प्रश्न निकाली लागतील.
लाडक्या बहीण योजनेवर बोलताना दरेकर म्हणाले की, शासनाची कुठली योजना असेल त्यात काही निकष, दोष असतील, घाईगडबडीत चुका झाल्या असतील तर दुरुस्त करणे ही शासनाची जबाबदारी असते. लाडक्या बहिणींच्या संदर्भात सदोष खाती असतील तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले होते की पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची योजना पारदर्शकपणे सुस्थितीत आणण्याची गरज आहे. तेच त्या ठिकाणी होतेय. लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही. योजना अविरहितपणे चालू राहील. जे २१०० रूपये देण्याचे आमच्या वचननाम्यात होते तेही निश्चितपणे दिले जाईल. तसेच नागपूरला अधिवेशन आहे. या अधिवेशनात या योजनेसंदर्भात हप्ताही येईल आणि २१०० रुपया संदर्भातही भुमिका स्पष्ट होईल.
ते पुढे म्हणाले की, शिंदे यांच्या शिवसेनेत कोण मंत्री असावेत हा सर्वस्वी शिंदेंचा आणि त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. काही नेत्यांवर किंवा मंत्र्यांवर भाजपाची महायुती सरकार म्हणून काही भुमिका असेल तर आमचे केंद्रातील नेतृत्व शिंदे यांच्याशी चर्चा करेल. खातेवाटपासंदर्भात तीन पक्षांचे नेते आणि मुख्यमंत्री चर्चा करतील. त्यानंतर केंद्रातील आमचे नेतृत्व पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अमित शहा, जे. पी. नड्डा आणि संसदीय मंडळ सल्ला देतील. त्यानंतरच खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल, असेही दरेकर म्हणाले.
बावनकुळे आणि शिंदे यांच्या भेटीवर बोलताना दरेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत. ते दिलदार माणूस आहेत. राज्याचे हीत त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची राज्यभर छबी आहे. एवढे मोठे बहुमत दिल्यानंतर ते अजिबात नाराज नाहीत. फडणवीस यांच्या नेतृत्वात अजित पवार, एकनाथ शिंदे एकत्रितपणे महायुती सरकार म्हणून काम करतील. एकनाथ शिंदे पुन्हा त्याच दमाने, ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी सरकारच्या माध्यमातून कार्यरत राहतील.
