Screenshot_20230628_111422_Facebook

शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवू नये !

मुंबई, दि. ९ डिसेंबर ;

मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही. मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचे  डोके ठिकाणावर येईल असा हल्लाबोल करत शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीतील मतांची आकडेवारी देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली असून २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी डोळे उघडून नीट वाचा. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचे डोके ठिकाणावर येईल असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *