महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरचे राज्य करु!
महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरचे राज्य करु!
पिंपरी चिंचवड,दि १५ नोव्हेंबर :
महाराष्ट्राचे राज्य हातामध्ये द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदलवू. एकेकाळी महाराष्ट्र राज्य देशात एक नंबरचे राज्य होते. भाजपवाल्यांच्या राजवटीत आज महाराष्ट्राचा नंबर सहावा आणि सातवा झाला आहे तो पुन्हा एकदा एक नंबरवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेला शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी महापौर आणि आमचे सहकारी उदयभान पानसरे, काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन धोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषार कामठे, आम आदमी पार्टीचे केतन लोंढे, मनोहर कांबळे, रवी लांडगे, धनंजय आढाव, प्रकाश वरपे, माजी महापौर संजय वाघेरे उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता वापरायची ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी कधी घेतली नाही. त्यांचे सगळं लक्ष सत्तेच्या केंद्रीकरणाकडे होतं. सत्तेमध्ये काही गुण असतात, काही दोष असतात. सत्ता ही खूपदा केंद्रित होते आणि केंद्रीत झालेली सत्ता ही भ्रष्ट होते. आम्हाला इथली सत्ता केंद्रित होऊ द्यायची नव्हती. महाराष्ट्राची सत्ता मविआला दिली तर राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवू, त्यांच्यावर अधिक लक्ष देऊन त्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेत मालाला किंमत देऊ,शेतीमध्ये आधुनिकता आणू आणि शेती समृद्ध कशी होईल? याकडे लक्ष देऊ. यासारखे अनेक कार्यक्रम आम्हाला राबवायचे आहेत. मविआच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करा, लोकांचे प्रश्न सुटतील कसे? स्त्रियांना संरक्षण कसे मिळेल? शेतकरी आत्महत्यांपासून कसा वाचेल? तरुण मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? अशा अनेक गोष्टी करण्यासाठी आम्ही तयार आहोत त्यासाठी तुमची मदत पाहिजे. २० तारखेला मतदानासाठी जा, मतदान केंद्रावरचे चित्र पहा आणि सुलक्षणा शीलवंत, अजित गव्हाणे, राहुल कलाटे या तिघांनाही मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन शरद पवारांनी केले.
