शेतकरी, श्रमिकांना मदतीचे पॅकेज कधी ?
मुंबई, दि. 18 सप्टेंबर 2020:
कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, श्रमिकांना अद्याप मदतीचे पॅकेज का दिले नाही, महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना का झाला नाही ? याबाबत राज्य शासनाची कान उघडणी करुन मुंबई उच्च न्यायालयाने भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची याचिका दाखल करुन घेतली आहे. 22 आक्टोबरला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांना ना मदतीचे पॅकेज दिले , ना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेचा लाभ दिला. याबाबत
भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. आज ही याचिका दाखल करुन घेऊन न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितल्याने 22 आक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. के. तातेड आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज ही याचिकेची व्हिडीओ काँन्फरन्सव्दारे सुनावणीसाठी आली असता त्यांनी शासनाला मदत का दिली नाही? याबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले.
केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा अशा अनेक राज्यांनी आपल्या राज्यात मदतीची पॅकेज जाहीर केली. मात्र महाराष्ट्र शासनाने अशाच प्रकारे कोणतेही मदतीचे पॅकेज जाहीर केलेले नाही. तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ ही शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे कोरोना मुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याकडे लक्षवेधत महाराष्ट्र शासनाने मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करीत ही याचिका आशिष शेलार यांनी केली आहे.
