देशाच्या संविधानात छ. शिवाजी महाराजांचे विचार:
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर;
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचार विचारांचे पालन करावे लागते. शिवाजी महाराज हे ज्या कार्यासाठी लढले, जगले त्यातील थोडे तरी आपण आत्मसात केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महान कार्य केले व अन्यायाविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारच देशाच्या संविधानात आहेत, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज नसते तर हे संविधान नसते असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.
कोल्हापुरातील कसबा बावडा भागात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात दोन विचारधारा आहेत, एक विचार धारा देश जोडणारी, सर्वांना सोबत घेऊन काम करणारी तर दुसरी विचारधारा संविधान संपवणारी आहे. ही विचारधारा लोकांना घाबरवते, ह्या विचारधारेचे लोक शिवाजी महाराजांना नमस्कार करतात पण त्यांच्या विचारांचे पालन करत नाहीत. याच विचारधारेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही. त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला पण तो काही दिवसातच कोसळली. ही राजकीय लढाई नाही तर विचाराची लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या उचगाव येथे टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर महाराजांना अभिवादन केले.
