राज्यात सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
मुंबई दि. २५ सप्टेंबर;
आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजप सोबत सत्तेत जाऊन बसले. लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले असे अजित पवारांना सुनावत, ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले त्यांनी आम्हाला सोडून दिले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, परळीमध्ये मोठी सभा घेऊ आणि दाखवून देऊ. राज्यातील सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राजेश फड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्यसभा खासदार फौजिया खान आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सरचिटणीस अदितीताई नलावडे, सरचिटणीस रवींद्र पवार, यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारं पाहिजे, येथील चित्र बदलतय, लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा ते दिसलं. देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही 400 पार निवडून येणार, पण त्यांचे किती खासदार आले. राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 जागा आपण जिंकून आणल्या, असे शरद पवार म्हणाले.
