मुंबई, दि. १७ सप्टेंबर ;
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाडची जननायक राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची कुवत आहे का? सूर्यावर थुंकण्याआधी आपली लायकी पाहावी. संजय गायकवाड, तोंड सांभाळून बोला, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
आमदार संजय गायकवाडांचा समाचार घेताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिले भाजपाचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधीपक्ष नेत्याला जीवे मारण्याची उघड उघड धमकी देतो. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह काहीच बोलत नाहीत. आणि आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे हे गुंड प्रवृत्तीचे आमदार देशाच्या विरोधीपक्ष नेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतात. यावर शिंदे आणि फडणवीस यांची भूमिका काय? कायद्याचे आणि संविधानाचे राज्य खरेच राहिले आहे का?राज्यातील मुलींच्या सुरक्षेवर बेताल विधाने करणारे, भररस्त्यात सामान्य नागरिकांना मारहाण करणारे, तलवारीने वाढदिवसाचा केक कापण्याचा प्रताप करणारे संजय गायकवाड यांची संविधान आणि राहुल गांधींवर बोलायची कुवत आहे का? असे संतप्त सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारले आहेत.
खासदार राहुल गांधी यांनी नेहमीच जाती निहाय जनगणना आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करून सर्व सामाजिक घटकांना न्याय मिळावा ही भूमिका मांडली आहे. पण येत्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला तोडून मोडून सत्ताधारी घाणेरडे राजकारण करत आहेत. मुळात हे सर्व यासाठी चालू आहे की, केंद्रात बसलेल्या मोदींच्या भाजपाला जातीनिहाय जनगणनाच नको आहे. मात्र यांची एक चालणार नाही. जातीनिहाय जनगणना होणारच. यांचा पापाचा घडा आता भरला आहे. कोण संविधान विरोधी, कोण महाराष्ट्र द्रोही, कोण गद्दार हे संबंध महाराष्ट्र ओळखून आहे. जनता यांना धडा शिकवणारच असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Leave a Comment