Ads

-

नवोदित शिल्पकाराला पुतळ्याची जबाबदारी देणे चुकच.

By Xtralarge News

September 1, 2024 11:04 pm

Ads

मालवण, दि. १ सप्टेंबर ;
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद व मनाला चटका लावणारी आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम नवोदित शिल्पकारास देण्याचा निर्णय चुकीचा होता. राज्यात राम सुतार आणि सारंग सारखे ज्येष्ठ अनुभवी शिल्पकार असताना नवोदितांना ही मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय चुकीचा होता असे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

मालवण मधील राजकोट किल्ल्याला रामदास आठवले यांनी भेट दिली. मालवण राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अक्षम्य आहे. मोठे वादळ आलेले नसताना पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी झाली पाहिजे. नेव्ही आणि पीडबल्यूडी च्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.जो कोणी मुख्य दोषी असेल त्यास कठोर शिक्षा झाली पाहिजे असा हा गुन्हा घडला आहे असे रामदास आठवले म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी माफी मागितली आहे, मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागितली आहे. त्यामुळे विरोधकांनी यात राजकारण करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा कसा मजबूत चांगला भव्य उभारता येईल यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य सरकारने नव्याने पुतळा उभारण्यासाठी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी आणि तज्ञांचा समावेश करून समिती नियुक्त करावी. या समितीने नवीन पुतळा कसा असावा आणि त्याच्या निर्मिती चे काम कुणास द्यावे याचा शासनाला सल्ला द्यावा अशी मागणी असून आपण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत असे रामदास आठवले म्हणाले.

कन्याकुमारी येथे तीन समुद्राचा संगम आहे तिथे अनेक पुतळे आहेत मात्र आजवर कधीही पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली नाही. मात्र राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली याचे दुःख आहे असे रामदास आठवले म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment