छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मस्तक टेकून माफी मागतो.

0
images - 2024-08-30T235112.314

 

पालघर, दि.३० ऑगस्ट-
देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हा जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले.

सर्व लाडक्या बहिणी व भावांना तुमच्या या सेवकांचा नमस्कार, अशा शब्दांत मराठी भाषेतून संवाद साधत प्रधानमंत्री मोदी यांनी संत सेनानी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरूवात केली.

सिंधुदुर्ग येथील घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी मस्तक टेकून मी माफी मागतो, असे सांगून प्रधानमंत्री पदासाठी नाव घोषित झाल्यानंतर मी सर्व प्रथम रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर जाऊन प्रार्थना केली होती. भक्तिभावाने आशिर्वाद घेऊन राष्ट्रसेवेला प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी आराध्य दैवत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आजचा दिवस हा विकसित महाराष्ट्र विकसित भारत संकल्पनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या विकास यात्रेतील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला एक समृद्ध व संसाधनयुक्त समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असून यामुळे भविष्यातही मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळेच 76,200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा, देशातील सर्वात मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वच बंदरामधून जेवढी कंटेनर वाहतूक होते, त्यापेक्षाही जास्त कंटेनर वाहतूक एकट्या वाढवण बंदरातून होणार आहे. हे बंदर देशाच्या व्यापार व औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनणार आहे. वाढवण बंदरामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून एक नवी ओळख निर्‌माण होईल. तसेच हा परिसर वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांना जोडला जाणार आहे. यामुळे वाढवण बंदरात वर्षभर कंटेनरची वाहतूक होणार आहे. या क्षेत्राची ओळख पूर्वी किल्ल्यांमुळे होत होती आता ही ओळख आधुनिक पोर्टमुळे होणार आहे.

मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ महाराष्ट्राला होत असून यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. वाढवण बंदरामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असून सुमारे 12 लाख रोजगार निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने नेहमीच मोठे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा विकास ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. त्यामुळेच नुकतेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात दिघी येथे बंदर औद्योगिक क्षेत्राला मंजुरी दिली आहे. ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नाचे प्रतिक बनेल. या पोर्टमुळे पर्यटन व इको रिसोर्टला चालना मिळेल, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *