लोकसभा निकालाने ५६ इंचाची छाती २६ इंच झाली.
नाशिक , दि. २४ ऑगस्ट;
जनता काँग्रेस व पुरोगामी विचाराच्या मागे आहे. धर्माचे नाव घेऊन कोणी राजकारण करणार असेल, राज्य घटनेला हात घालणार असेल तर चालू देणार नाही असा संदेश देशाला व उन्मत झालेल्या भाजपा सरकारला महाराष्ट्राच्या जनतेने दिला. लोकसभा निकालाने ५६ इंचाची छाती २६ इंच झाली असा हल्लाबोल विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
थोरात पुढे म्हणाले खी, शेतीला कायम दुय्यम दर्जा देणारे लोक भाजपाचे आहेत, मध्यंतरी गारपीट झाली द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या पण त्याला नुकसान भरपाई दिली नाही अशा शेतकरी विरोधी भाजपा सरकारला धडा शिकवायचा आहे. नाशिक, नगर हे पुरोगामी विचाराला ताकद देणारे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ताकद दिली पाहिजे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, लोकसभेत काँग्रेस इंडिया आघाडी सक्षम विरोधी पक्ष असल्याने आता भाजपाला मनमानी करता येत नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासह चार विधेयके मोदी सरकारला मागे घ्यावी लागली, ही विरोधी पक्षाची ताकद आहे. आता विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ताबदल केला पाहिजे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत ११ व्या क्रमांकावर आहे, गुजरात, तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत. नाशिकमधून महाविकास आघाडीच्या १५ च्या १५ जागी विजय मिळवा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आणा, राज्याचे गतवैभव परत आणू असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, विधिमंडळ अधिवेशनात उद्योगमंत्री श्वेतपत्रिका काढणार होते त्याचे काय झाले. हिम्मत असेल तर गुजरातला महाराष्ट्रातून किती उद्योग गेले त्याची श्वेतपत्रिका आता काढा, असे आव्हान त्यांनी दिले. राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली असून महाराष्ट्र अविवाहित बेरोजगारांचे राज्य झाले आहे.महायुती सरकार गुजरात चरणी लोंटागण घालत आहे. १५ वर्षात जेवढे टेंडर काढले नाहीत तेवढे या २ वर्षात खोकेबाज व धोकेबाज सरकारने काढले आहेत असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
