• Thu. Oct 10th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार.

ByXtralarge News

Aug 5, 2024
Visits: 111 Today: 1 Total: 3834084

सोलापूर, दि. ५ ऑगस्ट: –

परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता माळी यांनी मांडला. तसेच आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही शिकवण त्यांनी दिली. संत शिरोमणी सावता महाराज विकास आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातील १०० कोटीचा पहिला हप्ता आपण मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांचे समाधी मंदिर असलेल्या  अरण येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री अतुल सावे,यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आमदार प्रा. राम शिंदे आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर,आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार राम कांडगे,बळीराम शिरस्कार,ॲड.मंगेश ससाने, ॲड. सुभाष राऊत, प्रा. डॉ. सुवर्णा चव्हाण गुंड, रविकांत महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, महामंडलेश्वर मनीषानंद महाराज, रखमाजी महाराज, केशव महाराज उखळीकर, अभिमन्यू उबाळे, लोखंडे महाराज यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री फडवणीस पुढे म्हणाले की, संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला तसेच समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य केले. आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठूरायाची पालखी अरण येथे येते ही ही घटना खूप महत्त्वाची आहे व 1295 मध्ये अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आजच्या समाजाला ही संतांची नितांत गरज आहे. आपल्या राज्यातील समाज जाती-जातीमध्ये विखंडित होत आहे. मताच्या राज कारणामुळे समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. सर्वांना सोबत घेऊन एकसंघ समाज निर्माण करण्याचे जी संतपरंपरेची विचारसरणी होती ती विचारसरणी अंगीकरणाची गरज आहे त्यातूनच एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकेल, असे मत उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराजांचे मराठीत लिहिलेले अभंग महत्वपूर्ण पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे येथील भिडे वाडा केस राज्य शासनाने जिंकलेली असून या वाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल असे माहिती फडणवीस यांनी दिली.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, संत शिरोमणी सावता महाराज वास्तुशिल्प आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच या भागाचा विकास होऊन भक्तांना येथे चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात भिडे वाड्याचा निकाल राज्य शासनाच्या बाजूने लागला असून १५ ऑगस्ट २०२४ नंतर २०० कोटीच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन प्रधान मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्याचा मानस मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून दिलेला आहे शासनाचा हा निर्णय म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेच काम शासन नेटाने पुढे नेत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य शासन लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीला मोफत वीज, मागेल त्याला सौर पंप, तीन सिलेंडर मोफत योजना, मुख्यमंत्री तीर्थटन योजना अशा योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

संत शिरोमणी सावता महाराज यांच्यावर आधारित असलेले “संत सावता माळी अभंग व विचार” या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाले. या पुस्तिकेच्या लेखिका प्रोफेसर सुवर्णा चव्हाण गुंड या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत सावता महाराज भक्त परिवार मेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ व विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रभू महाराज माळी यांनी ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र अरण येथे भाविक, वारकरी यांच्यासाठी देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. राज्यातील इतर तीर्थक्षेत्राच्या मानाने पारं तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने उपेक्षित असल्याचे सांगून या तीर्थक्षेत्र विकासासाठी भरून निधी शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या कार्यक्रमास सावता महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *