जरांगेमुळे मराठी मुले EWS लाभापासून वंचित.
मुंबई, दि, २ ऑगस्ट :
राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज दाखल केलेल्या मराठा उमेदवारांच्या भरती प्रक्रियेला नुकताच स्थगिती आदेश देण्यात आला. यावर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काही लोकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे मराठा समाजाची मुले ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित राहिली असल्याचा आरोप केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, आमचे पहिल्यापासून नम्रपणे हेच सांगणे होते आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत ज्या सवलती चालू आहेत जे ईडब्लूएस आरक्षण आहे ज्यामध्ये मराठा समाज ९० ते ९५ टक्के लाभ घेत होता ते चालू राहावे, परंतु जरांगेंनी प्रश्न निर्माण केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ईडब्लूएसचा लाभ मराठा समाजातील तरुण घेऊ शकले नाही त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मराठा तरुणांचे झालेले नुकसान कोण भरून देणार आणि याची जबाबदारी कोण घेणार? अशी विचारणा दरेकरांनी केली. तसेच काही लोकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे मराठा समाजाच्या मुलांना ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित राहावे लागले आता पुन्हा ईडब्ल्यूएसमधून आमच्या मुलांना का घेतले नाही म्हणून विचारणा करताहेत. त्यांचे ढोंग लोकांसमोर दिवसेंदिवस उघड होताना दिसतेय, अशा शब्दांत दरेकरांनी जरांगे यांच्यावर तोफ डागली.
केवळ राजकारणासाठी राजकारण करू नका हे आमचे सांगणे आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले ते कुठल्याही प्रकारे कोर्टाने फेटाळलेले नाही किंबहुना त्या आरक्षणाची अंमलबजावणीही आता ज्या पोलीस किंवा सरकारी भरत्या झाल्या त्यात १० टक्के मराठा समाजाची मुले समाविष्ट झाली. सगेसोयरे, नोंदणी, इतर विषय क्लिष्ट झालेत त्यातून मुलांचे ईडब्ल्यूएसचे नुकसान झाले. सरकार स्पष्ट, पारदर्शक आहे. परंतु प्रश्न धगधगतच राहावा आणि त्यातून राजकीय पोळी भाजावी असे असेल तर त्याला सरकार काय करणार, असेही दरेकर म्हणाले.
