‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चा शुभारंभ….
कुटुंबप्रमुख म्हणून घराघरात जनजागृती करण्याचे सरपंचांना आवाहन…
मुंबई, दि १५ सप्टेंबर :
माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत त्यामुळे प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी व परिवारांना आरोग्यसंपन्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आज मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आयोजित एका ऑनलाईन मेळाव्यात राज्यातील सरपंचाना संबोधित केले व या मोहिमेचे उद्घाटनही केले. या वेब मेळाव्यास राज्यातील सुमारे २८ हजार सरपंचांची उपस्थिती होती.
या मोहिमेस ऐतिहासिक मोहीम असे संबोधून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. सरपंचानी आपापल्या गावातील लोक हे मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का,हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे व हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे. गावकरी हे सरपंचांचे ऐकतात, विशेषत: या कोरोना साथीमध्ये गावोगावी सरपंचांनी प्रयत्नपूर्वक कोरोनाला आपल्या गावात येऊ देण्यापासून रोखले आहे.
आजपर्यंत गेल्या ६ महिन्यांत कोरोनाविरुद्ध आम्ही लढतो आहोत पण ही लढाई आता एकांगी राहणार नाही तर सर्वसामान्य लोक, नागरिक यांना सहभागी करून घेऊन ही लोकचळवळ करा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एका महिन्यात आपल्याला प्रत्येक घरी दोनदा भेट द्यायची आहे. यासाठी असलेली पथके सर्व घरी व्यवस्थित भेटी देतील याची जबाबदारी सरपंचांनी घ्यावी.
सरपंचांकडून स्वागत…
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात ६ सरपंचांनी मनोगते व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यातील फराकटेवाडी येथील सरपंच शीतल फराकटे, रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगावच्या श्रद्धा मोरे, नाशिक जिल्ह्यातील कोटमगावाचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, नागपूर जिल्ह्यातील कढोळीच्या सरपंच प्रांजली वाघ, अमरावती जिल्ह्यातील बोरला आदिवासी गावाचे सरपंच संजय भास्कर, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सरपंच विलास शिंदे यांनी या मोहिमेची कशी तयारी केली आहे ते सविस्तर सांगितले आणि ती पूर्णपणे यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
