शिवरायांच्या वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्यात !
सातारा, दि. २० जुलै:
रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. संग्रहालयात मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी 350 व्या शिवराज्यांभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा चार टपाल तिकीटांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा असून त्यांची शिकवण तत्वे अंगिकारल्यास आयुष्याची लढाई आपण सहज जिंकू. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या, कर्तुत्वाच्या खुणा जिथं कुठं असतील तिथून त्या शिवप्रतापाच्या भूमीत पुन्हा आणल्या जातील. लंडनहून सातारा येथे आणण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांच्या दर्शनातून त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडते. ही वाघनखे म्हणजे त्यांची वीरगाथा आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढे यश ही मोठे हे त्यांच्या जीवनातील विविध घटनांमधून दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य साकार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून समाजातील सर्व घटकांसाठी अनेक हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. विविध योजना शासन राबवित असून त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गड-कोट किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे काम करेल. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १५० कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नूषा महाराणी ताराबाई यांच्या संगममाहूली येथील समाधी स्थळाचा जीणोद्धार राज्य शासन करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
