जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट करणे अयोग्य..

0
images - 2023-11-10T193746.316

मुंबई, दि. १७ जुलै –

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी साथ देऊन शांततेत चर्चेच्या मार्गातून मराठा समाजाला न्याय द्यावा. उगाच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा चर्चेतून, समन्वयातून मार्ग काढण्याची भुमिका घ्यावी. हे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे, असा सल्ला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगे यांना दिला आहे.

 

दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत तो डाव मी मोडणार अशा प्रकारचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे यांची सुरुवातच आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट हाच आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. अशा प्रकारची वक्तव्य करायला जरांगेंना कुणीतरी फ्रिडींग देतेय का हे तपासण्याची गरज आहे. आपल्या शस्त्राचा हत्यार म्हणून वापर होतोय का याची तमाम मराठा समाजाला चिंता आहे.

दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विश्वास आहे. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले, टिकवले. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या हिताच्या अनेक योजना, सवलती आणल्या. आताही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिलेले आहे. ते टिकवण्याची हमीही दिलेली आहे. सगेसोयऱ्यांचा मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. त्यामुळे सगेसोयऱ्याच्या विषयावर चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु केवळ देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचे, एकेरी बोलायचे, चिचोरचाळे बोलायचे. मराठा समाज बरोबर आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारचे टार्गेट करणे योग्य नाही हे जरांगेंनी समजून घेण्याची गरज आहे.

 

तसेच महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील उपेक्षित समाजासाठी अनेक योजना आणून न्याय देण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्याचा अजेंडा आपण राबवताय की काय? विरोधी पक्षाचा अजेंडा आपण राबवताय की काय? फडणवीसांच्या विरोधातील ज्या काही शक्ती आहेत त्यांचा अजेंडा आपल्या मार्फत राबविला जातोय की काय? अशा प्रकारचा संशय येत असल्याचेही दरेकर म्हणाले.

 

जरांगेंनी केवळ आंदोलनाच्या विषयावर सरकार म्हणून बोलावे. केवळ देवेंद्र फडणवीस बाकी विषय बाजूला, विरोधी पक्षाबाबत बोलायचे नाही. विरोधी पक्ष बैठकीला आला नाही त्यावर बोलायचे नाही. म्हणून महाराष्ट्रासमोर आणि जरांगे पाटलांसमोर केवळ देवेंद्र फडणवीस हा एकमेव प्रश्न उभा राहिलाय असे त्यांच्या वक्तव्यातून वाटते. महाराष्ट्र रक्तबंबाळ व्हावे असा जर त्यांचा डाव असता तर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रीला सर्वपक्षीय बैठकीसाठी पुढाकार घेतला असता का? फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि कर्तव्य त्यांचे आहे. ते राज्य रक्तरंजित कसे होऊ देतील. ते रक्तरंजित होऊ नये यासाठीच त्यांचा अट्टाहास असल्याचेही दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *