तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन !

0
20240717_090025

पंढरपूर, दि. १७ जुलै :

विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर केलेले आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मंदिर समितीचा एमटीडीसी सोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30 टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीने वाढ केलेली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आत्तापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांच्या लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधाबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लवकरच एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *