छत्रपतींच्या भूमीतून शिवाजीरावांना निवडून द्या. 

0
IMG-20240507-WA0055

शिरूर, दि. ८ मे :-

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीतून शिवाजीराव आढळराव पाटील यांना लाखोंच्या मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन भाजपा गटनेते आणि शिरूर लोकसभेचे निरीक्षक आमदार प्रविण दरेकर यांनी शिरूरवासियांना केले आहे.

जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे शिरूर येथील न्हावरे येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत दरेकर बोलत होते. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागताना दरेकर म्हणाले की, अभिनेत्यात आणि नेत्यात फरक आहे. अमोल कोल्हे अभिनेता आहे. शिवाजीराव आढळराव आमचे नेता, कार्यकर्ता आहेत. एकवेळ अभिनेता चांगल्या प्रकारचा अभिनय करू शकतो परंतु चांगल्या प्रकारचे विकासकाम करू शकत नाही. त्याकरिता हाडाचा कार्यकर्ता, नेता लागतो, ते शिवाजीराव आढळराव आपल्यासमोर आहेत. लोकांसाठी पाच वर्षात आपण नेमके काय केलात ते सांगा. पाच वर्षाच्या काळात कुठल्याही गावात संपर्क नाही, कवडीचा निधी नाही, ८० टक्के निधी परत गेला. हे तुमचे कर्तृत्व. निष्क्रिय खासदार झाल्यानंतर, आपला शो फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा याठिकाणी लोकांसमोर यायचे धाडस कसे होते.

 

शिवाजीराव आढळराव यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःचे नाव केलेय. ते करत असताना या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. जन्म देणाऱ्या मातीचे पांग फेडायचे आहे त्या भूमिकेतून २० वर्षांपूर्वी निर्धार केला आणि पूर्णपणे येथील जनतेसाठी झोकून दिले. १५ वर्ष आढळराव यांनी प्रामाणिकपणे कामं केले हे जनता आता बोलून दाखवत आहे. चिंता करायचे कारण नाही. तुमची १५ वर्षाची कारकीर्द आणि कोल्हेचे ५ वर्षाचे ढोंग जनतेला नीट कळतेय. रेकॉर्डब्रेक मतदानाने शिवाजीराव तुम्ही निवडून येणार आहात, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

 

दरेकर पुढे म्हणाले की, अमोल कोल्हे यांना कशासाठी आणि का मतदान करायचे. इथे हजारो कोटींचा निधी लागणार आहे. जर तुम्ही खासदार झालात तर करणार काय? निधी कुठून आणणार? एकतर देशातील जनतेने ठरवले आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार. भाजपा आणि महायुतीचे सरकार या देशात पुन्हा येणार ही काळया दगडावरील रेष आहे. देशात नरेंद्र मोदींच्या आणि राज्यात शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात सरकार, मग तुम्ही करणार काय? केंद्राकडून निधी आणि राज्य सरकारकडून पाठबळ हवे असेल तर आपल्याला शिवाजीराव यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे दरेकरांनी म्हटले.

 

अमोल कोल्हे यांची भाषणे मी वेगवेगळ्या माध्यमांतून ऐकतो. एकदाही त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलताना पाहिलेले नाही. ते म्हणतात त्यांच्यात अजून मनोमिलन व्हायचे आहे. मग इकडे व्यासपीठावर बसलेली आम्ही सर्व मंडळी ताकदीने, एकजुटीने शिवाजीराव यांच्यामागे असल्याचे चित्र या मतदारसंघात दिसतेय. ही निवडणूक शिवाजीराव यांना खासदार व्हायचे एवढ्यापुरती सिमीत नाही. ही निवडणूक देशाची आहे. उद्या माझ्या देशाचे नेतृत्व कोण करू शकतो? पंतप्रधान खुर्चीवर कोण बसू शकतो? हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे सांगत दरेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली. पंतप्रधान मोदींनी १० वर्षात जे कामं केले त्यावर कळस लावायचा असेल तर ‘अब की बार ४०० पार’ त्यामध्ये छत्रपतींना जन्माला ज्या मातीने घातले त्या मातीतील शिवाजी ४०० मध्ये असायला हवा. घड्याळाला मतदान म्हणजे पंतप्रधान मोदींना मतदान आहे असेही दरेकरांनी म्हटले.

 

दरेकर पुढे म्हणाले की, गेली १० वर्ष जय म्हल्हार संघटनेच्या मार्फत रामोशी समाज, बेरड, धनगर, मातंग, ओबीसी समाज असेल या सर्वांच्या आयुष्यात बदल व्हावा यासाठी प्रामाणिकपणे काम करताहेत. या बहुजन समाजाच्या नावे मतं मागायची पण त्यांचा उत्कर्ष होईल यासाठी जाणत्या राजाने काही केले नाही. केवळ ही लोकं म्हणजे आमच्या मतांची फॅक्टरी एवढेच पाहिले, असा टोला दरेकरांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. बेडर समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आमच्या सरकारने स्थापन केले. केवळ स्थापन केले नाही तर आवश्यक निधीची तरतूदही सरकारने केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे कामही याच शिंदे सरकारने केल्याचे दरेकरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *