… सरकार तसूभरही मागे हटणार नाही!
मुंबई, दि. 11 सप्टेंबर:
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. ठाकरे सरकारला काहींनी अल्टिमेटम दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आज महत्वाची बैठक पार पडली. मराठा समाजाच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही, हा लढा आपल्या सर्वांचा आहे,मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व करणार आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांशी देखील सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. राजकारण करण्यासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करता कामा नये’.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील,अभ्यासक यांच्यासमवेत व्हीसीद्वारे संवाद साधला. या बैठकीस मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात हे ऑनलाईन तर उपसमिती सदस्य एकनाथ शिंदे, अनिल परब, दिलीप वळसे पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते.
यासंदर्भात अजित म्हणाले की, ‘न्यायालयाने निर्णय दिला असला तरी अपिल करण्यास वाव आहे. जे
न्यायालयीन मार्ग आहेत ते सर्व वापरले जातील. मराठा समाजाच्या या प्रश्नावर सरकार पुरेशा गांभीर्याने आणि जबाबदारीने मार्ग काढत आहे. मराठा आंदोलकांवर यापूर्वी दाखल झालेले गुन्हे काढून घेण्याच्या बाबतीतही गृहमंत्र्यांसमवेत चर्चा झाली आहे.’
सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती देण्याचा निर्णय अनपेक्षित असला तरी आता कायदेतज्ज्ञांशी बोलून मोठ्या घटनापीठासमोर हे प्रकरण कसे लवकरात लवकर आणता येईल, तसेच स्थगिती कशी उठवता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
