काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली.
शिराळा, ता. २९ एप्रिल:
शिवसेना-भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आपण सोडवली, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. तुमचा शिराळा डोंगराळ भाग तसे माझेही जन्मगाव डोंगराळ भागात आहे. त्यामुळे डोंगरी भागाच्या समस्यांची मला जाणीव आहे. डोंगरी भागामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी धैर्यशील माने यांना खासदार म्हणून पाठवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. आपल्या सरकारमध्ये कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील कामेरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सरकार निधी देताना कुठलाही जातीभेद करत नाही, जातीवाद करत नाही. इथे मंदिर आणि मशिद एकत्र आहेत. हे देशाला आणि राज्याला दाखवण्यासारखे उदाहरण आहे. मुस्लिम समाजाला केवळ मतांसाठी वापरायचे आणि फेकून द्यायचे हे आपण करणार नाही. जात पात न बघता या समाज हिताचे निर्णय या सरकारने घेतले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण दिले. कामेरी गावातील हजारो वर्षांपूर्वीचे भवानी मातेच्या मंदीराच्या विकासासाठी निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी कामेरी गावात राहणारे ज्येष्ठ सिनेकलावंत विलासराव रकटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैयक्तिकरित्या 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली.
वाळवा येथील धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. कोयना धरणग्रस्तांप्रमाणेच येथील धरणग्रस्तांना न्याय देऊ, नागनाथ अण्णा नाईकवाडी धरणग्रस्त महामंडळाबाबत आणि त्यांच्या स्मारकासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वाळवा तालुक्यातील समस्या धैर्यशील माने सोडवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जन्म राष्ट्रनितीसाठी झाला. जगभरात भारताचे नाव मोदीजींनी रोशन केले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जन्म कट कमिशन आणि करप्शनसाठी झाला. त्यांच्याकडे अजेंडा नाही, नियत नाही आणि नेतासुद्धा नाही. मोदीजींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही, अशी टीका विरोधकांवर केली. संविधान बदलणार असा खोटा प्रचार आणि संभ्रम पसरवण्याचे काम विरोधांकडून केला जातोय कारण त्यांना पराभव दिसतोय, असे ते म्हणाले.
