सरकार गेल्याने ठाकरे भ्रमिष्ट आणि सैरभैर.

0
IMG-20240424-WA0058

हिंगोली, दि. २४ एप्रिल:

राज्यातील सत्तांतरामुळे भ्रमिष्ट आणि सैरभैर झालेले आता बेछुट आरोप करत आहेत. आमचा राजकारणातील जेवढा अनुभव आहे तेवढे तुमचे वय देखील नाही तरीही आरोप करत आहात, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना काढला.

हिंगोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. विरोधांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की ज्यांचे वय नाही ते आता सैरभैर होऊन आरोप करत आहेत. मला नीच म्हणाले, एका शेतकऱ्याच्या मुलाला शिवी दिली.हा मराठा समाजाचा अपमान आहे त्याचे उत्तर हा समाज मतपेटीतून देईल.

हिंगोलीत बाबुराव कदम या सर्वसामान्याला संधी दिली, हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. राज्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले. हे सरकार अहोरात्र काम करणारे सरकार आहे. राज्यात काही भागात गारपीट, अवकाळी पाऊस सुरु आहे. निवडणूक असली तरी शेतकऱ्यांचे नुकसान भरून देण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाने आतापर्यंत १५ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

संविधान बदलणार या भूलथापा सुरु आहेत. संविधान कुणी बदलू शकत नाही. डाॅ. बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसने केला, त्यांचा निवडणुकीत पराभव केला त्यामुळे काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मराठा आंदोलनाला मूका मोर्चा अशी ज्यांनी टिंगल केली ते महाविकास आघाडीत आहेत. आम्ही मराठा समजाला १० टक्के आरक्षण दिले आणि ते कायद्याच्या चौकटीत टिकवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *