निलेश लंकेच्या उमेदवारीने विखेंची झोप उडाली..
अहमदनगर, दि. २० एप्रिल :
विखे यांना आता आत्मविश्वास राहिलेला नाही. निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे. विखेंना निलेश लंकेंची चिंता वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, असा निरोप उद्योजक घेऊन आला होता. हा निरोप महसूलमंत्र्यांनी उद्योजकामार्फत पाठविला होता, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर निलेश लंके यांच्या जाहीर सभेत बोलताना केला..
शरद पवार म्हणाले की, निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते. यावेळी ची निवडणूक महत्त्वाची का? आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे. आज काहीतरी देशात वेगळं घडत आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आहे. वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारांवर गदा येईल, संकट येतील. ते होऊ द्यायचे नाही. गेले दहा दिवस मी वाचत आहे.
मोदी बोलताहेत, देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणखी काही नेते बोलत आहेत. या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार, आमच्या विरोधात हा खोटा प्रचार आहे. आम्ही नाही प्रचार केला. केंद्र सरकारचे एक मंत्री आहेत, त्यांचे नाव हेगडे त्यांनी एक भाषण केलं लोकांसमोर या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या. हे मी म्हणत नाही, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय. तो म्हणतोय की घटना बदलायची. आता घटना बदलायचा निकाल घेऊन कोणी राजकारण करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. या घटनेने सर्वांना सारखे अधिकार दिले. तुम्हाला जसे अधिकार आहे मलाही तसेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैशिष्ट्य हे आहे, की समान संधी, समान अधिकार. त्या समान अधिकारावर जे संकट यायलं लागलं आहे, त्यावेळेला आपण सर्वांना जागृत राहणं आणि जे आणतात त्यांना दूर ठेवणं हे काम आपल्याला करायचे आहे. ते सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
माझ्या वाचण्यात आले की विरोधी उमेदवाराने प्रश्न उपस्थित केला की संसदेमध्ये इंग्रजीत बोलायचे असते. संसदेमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. मी स्वतः इंग्रजी आणि हिंदीत आणि शुद्ध मराठीत सुद्धा बोलतो. मराठीत बोलण्याचा अधिकार आहे. हिंदी आणि इंग्रजीचे भाषांतर करण्याची सुविधा असते असेही शरद पवार म्हणाले.
भाषणादरम्यान पवारांनी बाळासाहेब विखे यांच्या लोकसभा निवडणुकीचा एक किस्साही सांगितला. बाळासाहेब विखे यांना निवडणुकीला उभे राहायचे होते. तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. मी नगरच्या दौऱ्यावर होतो. एक वाजता विखे हे माझ्याकडे आले. त्यांना भाऊसाहेब थोरात यांची मदत हवी होती. बाळासाहेब विखे यांना गाडीत बसवून रात्री तीन वाजता भाऊसाहेब थोरातांच्या जौर्वे या गावी गेलो. त्यांनी झाले गेले विसरून जाऊ, अशी विनंती थोरातांना केली होती. थोरात यांनी माफ केले आणि विखे हे विजयी झाले. आता ते बाळासाहेब थोरातांवर टीका करत आहे, याचा अर्थ त्यांच्याकडे माणुसकी नाही असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
