Ads

--

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करून अटक करा.

By Xtralarge News

February 27, 2024 6:18 pm

Ads

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी;

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास दाखवत होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी. जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावे, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली. तसेच आंतरवली सराटीत जी घटना घडली त्या कटात माजी मंत्री राजेश टोपे आणि आ. रोहित पवार यांचा सहभाग असल्याचा मोठा आरोपही यावेळी दरेकरांनी केला.

 

भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाचा विषय गांभीर्याने घेऊन १० टक्के आरक्षण देऊन समाजाला दिलासा देण्याचे काम केले. आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरही महाराष्ट्रात अशांतता, अराजकता पसरवली जातेय की काय अशा प्रकारचे चित्र जरांगे यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेय. अनेक गोष्टी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आल्या आहेत. जरांगे पाटलांसोबत काम करणारे बारस्कर महाराज ज्यांनी जरांगेंच्या सांगण्यावरून कोपर्डी प्रकरणात कोर्टाबाहेर आरोपीवर हल्लासुद्धा करण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्या बारस्करांनी आंतरवली सराटीत जी काही दगडफेकीची घटना झाली त्याचे प्लॅनींग राजेश टोपे यांच्या कारखान्यावर झाल्याचे म्हटले आहे. राजेश टोपे यांच्या कारखान्यावर हे षडयंत्र रचले गेले. त्यावेळी रोहित पवारही राजेश टोपे यांच्यासोबत होते. हे प्लॅनिंग करणारे टोपे आणि पवार यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकरांनी केली.

 

दरेकर पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. गुन्हे दाखल केले होते. या राज्यात सरकार म्हणून सर्वांना एकच न्याय पाहिजे. जरांगे आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे. राज्यात दोन कायदे होऊ शकत नाहीत. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच दुसऱ्यावर आरोप करताना महाराष्ट्रात सभा झाल्या. जेसीबीतून फुलांची उधळण झाली. जरांगे म्हणाले होते समाजाकडून एक रुपया घेणार नाही. मग या सभांना लाखो रुपये, ट्रॅक्टरला ३० हजार रुपये द्यायला आले कुठून? असा सवाल करत या सर्व आर्थिक व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही दरेकरांनी केली.

दरेकर यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भुमिका घेत याप्रकरणी एसआयटी नेमू. त्या चौकशीत जे काही सत्य आहे ते बाहेर येईल. सुडबुद्धीने कुणावरही कारवाई केली जाणार नाही.

No comments to show.

Leave a Comment