शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा..
मुंबई, दि. १९ फेब्रुवारी :
विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थ अर्जनासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तित्व घडण्यासाठी घेतले तरच भारत विश्वगुरू होईल असे राज्यपालांनी सांगितले.
जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य महाश्रमण, जैन विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती तथा केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, विद्यापीठाचे कुलगुरू बच्छराज दुगड, जैन विश्वभारतीचे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू,साध्वी तसेच स्नातक उपस्थित होते.
जैन धर्माने नेहमीच शांती, अहिंसा व सामोपचाराचा पुरस्कार केला आहे, असे सांगून, जैन धर्माची शिकवण आजच्या जगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत असून युवकांनी नावीन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्या व आपल्या सामर्थ्याचे योग्य नियोजन करावे असे राज्यपालांनी सांगितले.
संस्कार व मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य निर्माण कार्य होणार नाही असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावे असे मेघवाल यांनी यावेळी सांगितले. जैन विश्वभारती विद्यापीठाने राष्ट्रीय पांडुलिपी मिशन सफल करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
