भाजपाच्या सत्तेची मस्ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो.
भाजपाच्या सत्तेची मस्ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो.
मुंबई, दि. १८ फेब्रुवारी;
मोदी सरकारच्या १० वर्षाच्या काळात प्रशासन, ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स विभाग सारख्या स्वायत्त यंत्रणांचा स्वायत्तपणा काढून घेतला आहे. सरकारी यंत्रणा मोदी शहांच्या घरगडी झाल्या आहेत. मीडियात नेरिटिव्ह तयार केला जातो, यातून न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्ष फोडण्याचे राजकारण सुरु आहे. १० वर्षात मोदी शहा सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे, असा घणाघाती आरोप करत आगामी निवडणुका सर्वांसाठी महत्वाच्या आहेत, लोकशाही, देश व संविधान वाचवण्यासाठी ५० दिवसांची आहुती द्या, असे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.
लोणावळ्यातील काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीची लढाई अत्यंत महत्वाची आहे.कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला या सर्वांना भेटावे आणि घराघरात जावे लागेल. बुथ मजबूत करा, संघटन मजबूत करा, सैनिक मजबूत असतो त्याच ठिकाणचा राजा जिंकतो. येणारा काळ आपलाच आहे हे लक्षात ठेवा. भाजपाने देशात व महाराष्ट्रात जी परिस्थिती करून ठेवली आहे हे लोकांना आवडलेले नाही. जनतेला हे सर्व समजते आणि लोकच भाजपाला हरवणार आहेत. या लढाईत सर्वांना एकजूट होऊन लढावे लागेल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, या देशाच्या इतिहासात आपला उल्लेख असेल. हे लक्षात ठेवा आपण सत्याची लढाई लढणाऱ्याचा विजय होणार.
लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र बदलणार आहे. राज्य सरकारचे काय होईल सांगता येत नाही. ४० आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात शेतकरी, कामगार, छोटा व्यापारी, महिला कोणी सुखी नाही, सर्व घटक नाराज आहेत. बेरोजगारी, महागाई कमी झाली नाही. जय जवान, जय किसान म्हणतो आणि शेतकऱ्यांच्या रस्त्यावर मोदी सरकारने खिळे ठोकले आहेत. या सरकारने शेतकरी, कामगार व महिलांना सन्मान दिला नाही. राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मूर्मू यांना भाजपा सरकारने संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन व राम मंदिराच्या उद्घाटनास बोलावले नाही, भाजपा राष्ट्रपती असलेल्या महिलेचा सन्मान करु शकत नाही ते सर्वसामान्य महिलांचा मान-सन्मान काय करणार? महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या खासदार ब्रिजभूशण सिंहला भाजपाने पक्षात का ठेवला आहे? ज्या महिला खेळाडूंनी राष्ट्राचा गौरव वाढवला त्यांना न्याय मिळत नाहीत, महिलांची नग्न धिंड काडली जात आहे.
नोकरी भरतीत रोस्टर करण्याची गरज नाही हे भाजपा सरकार सांगत आहे, हे सांगणारे तुम्ही कोण? देशाच्या स्वातंत्र्यात भाजपाचा काय संबंध ? मोदींना सामान्य जनतेचे काही देणेघेणे नाही. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. तर दुसरा आमदार, हातपाय तोडा जामीन देतो, आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे अशी भाषा करतो, त्यांचा बॉस सागर बंगल्यावर बसला असेल तर आमचा बॉस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे हे लक्षात ठेवा. भाजपाचा जी सत्तेची मस्ती आली आहे ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शाहू, फुले, आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली आहे. समाजा समाजात भांडणे लावली आहेत, मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, हलबा सर्व समाजात भांडणे लावली आहेत. महाराष्ट्राची सामाजिक वीण बिघडवण्याचे काम केले जात आहे पण महाराष्ट्र हा बिहार,उत्तर प्रदेश होऊ शकत नाही तो महाराष्ट्र आहे महाराष्ट्रच राहिला पाहिजे आणि हीच जनतेची भावना आहे. असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
