मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२०:
अभिनेत्री कंगना राणावतचे प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेने तर हा मुद्दा आणखीनच तापवत ठेवला आहे. महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभीमानाला ठेच पोहचवणाऱ्यांना शिवसेना नेहमीच अंगावर घेत आली आहे. आताही शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे.महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच आणि महाराष्ट्राची ११ कोटी जनताही माफ करणार नाही, अशी तोफ शिवसेनेने डागली आहे.
सामनाच्या अग्रलेखात आज पुन्हा कंगणा व पत्रकार अर्नब गोस्वामी प्रकरणावरुन तुफानी हल्ला केला आहे…. मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्रसुद्धा आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
महाराष्ट्रातील ११ कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले १०६ हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. मऱहाटी जनांशी बेइमानी करणाऱ्या विकृतांशी मराठी माणूस सतत लढत राहिला. कोणीही यावे आणि महाराष्ट्राच्या मऱ्हाटी राजधानीवर टपली मारावी, कोणीही ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा देवेंद्र, फडणवीस यांचा ‘एकेरी’ नावाने उद्धार करणाऱ्या टिनपाट वृत्तवाहिनीच्या मालकास भाजपवाल्यांनी असा पाठिंबा दिला असता काय? आज ज्या पद्धतीने हे समस्त भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, तो ठामपणा आपल्या हद्दीत घुसलेल्या चिनी माकडांच्या बाबतीत दाखवला असता तर लडाख, अरुणाचलच्या सीमेवर देशाची बेइज्जती झाली नसती. देशाच्या इभ्रतीचे वाभाडे उघडपणे निघू नयेत म्हणून राष्ट्रभक्तांनी संयम बाळगला आहे इतकेच.