भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न..
लातूर, दि. २९ जानेवारी;
महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडी मिळून लढणार आहे. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेत नाहीत, सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत जे पक्ष भाजपाविरोधात लढत आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यातही लोकसभेच्या सर्वात जास्त जागा मविआच जिंकेल व राज्यातील लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवून भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करु, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
लातूर मध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारविरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. भाजपा सरकार जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका निवडणुका घेत नाही. जाहिरातीच्या आधारावर स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, महागाई, बेरोजगारी वाढली आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. मुंबईत सहा दिवसात २७ लाख लोकांचे सर्वेक्षण केले अशा बातम्या दिल्या जात आहेत, हे लोक बंद घरांचे सर्वेक्षण करत आहोत का? २०१४ साली मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते परंतु अजून आरक्षण दिले नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
लातूर येथील विभागीय बैठक प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, AICC चे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आमदार धीरज देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, लातूर जिल्हा ग्रामीणचे श्रीशैलश उटगे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव आदी उपस्थित होते.
