‘हृदयात राम आणि हाताला काम’ हे आपले हिंदुत्व.
‘हृदयात राम आणि हाताला काम’ हे आपले हिंदुत्व.
पिंपरी चिंचवड, दि. २१ जानेवारी:
२२ जानेवारीला अयोध्येत मोठा दिवस असून श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे पण हृदयात राम आणि हाताला काम हे आपले हिंदुत्व आहे, असा पुनरुच्चार शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांची महा निष्ठा, महा न्याय सभा पिंपरी चिंचवड येथे पार पडली, या सभेत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा पुनरुच्चार केला. ते पुढे म्हणाले कि, आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ असे म्हणाले मात्र आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चा काढावा लागतोय, हे सरकार आरक्षण देऊ शकले नाही. या सरकारने रोजगार मिळवून देण्याचीही हमी दिली होती, महागाई हद्दपार करू म्हणाले होते पण या प्रश्नांकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ ७० वर्षांपूर्वी त्यांनी काय केले ? हेच विचारण्यात ते मश्गुल आहेत. आता पुढे किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहात ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं..
सगळे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत, वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही कारण या कंपनीने त्यांचा करार रद्द केला आहे कारण या कंपनीला तिथे कारखाना उभारायला सात वर्षे लागणार होती . त्यामुळे त्यांनी देशातूनच आता हद्दपार व्हायचा निर्णय घेतला आहे म्हणजे गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झाले असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
